गारपिटग्रस्तांच्या मदत निकषावर वाशिमचे शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:34 PM2018-02-15T17:34:38+5:302018-02-15T17:37:08+5:30
मालेगाव : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या निकषाबाबत शेतकरी नाराज.
मालेगाव : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या निकषाबाबत शेतकरी नाराज असून, शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
मालेगाव तालुक्यात दिनांक ११ व १३ फेब्रुवारीला अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बीतील गहू, हरभरा पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाने मदतीसाठी जे निकष ठरवून दिले आहेत. त्यामध्ये ३० ते ५० टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या शेतकºयांनाच आर्थिक मदत मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी सहा हजार, तर ओलिताच्या पिकांसाठी १३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तथापि, मालेगाव तालुक्यात कोरडवाहू पिकांचे क्षेत्र अधिक असल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. या पीक नुकसानीचे पुन्हा सर्वेक्षण करून नव्याने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत असून, शासनाने शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शासनाने शेतकºयांना केवळ हेक्टरी सहा हजार रुपयांची अर्थिक मदत जाहीर केली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखे आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त असून, शासनाने गारपीटग्रस्त शेतकºयां हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी. ही मागणी मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढून मोठे आंदोलन पुकारणार आहे.
- प्रदीप पाटील मोरे, सरपंच कळमगव्हाण तथा जिल्हा उपाध्यक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशिम