वाशिम : वाढीव आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी; सात केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:02 AM2018-01-11T01:02:43+5:302018-01-11T01:02:56+5:30
वाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यापूर्वी वाढीव म्हणून मंजूर झालेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, आठ उपकेंद्र व एका ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचा तिढा सुटला असून, ७८ वाढीव पदांच्या बिंदूनामावलीलादेखील शासन स्तरावरून मंजुरात मिळालेली आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी शासनातर्फे ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची सुविधा उपलब्ध केली जाते. वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्यसेवा केंद्र, मनुष्यबळही अपुरे पडते. त्यानुषंगाने वाढीव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मनुष्यबळासंदर्भात शासनाच्यावतीने जिल्हा स्तरावरून बृहत आराखडा मागविला जातो. सन २0११ च्या जनगणनेवर आधारित वाढीव आरोग्य केंद्रांचा बृहत आराखडा शासनातर्फे २0१७ मध्ये मागविला होता. वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरात घेतल्यानंतर साधारणत: नोव्हेंबर २0१७ मध्ये बृहत आराखडा शासनाकडे पाठविला. या बृहत आराखड्यासंदर्भात आता जिल्हा नियोजन समितीची मंजुरात घेऊन आणखी स्वतंत्र अहवाल पाठविला जाणार आहे. बृहत आराखड्यानुसार, सात नवीन आरोग्य केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चार उपकेंद्र अन्यत्र स्थलांतरित करणे प्रस्तावित आहे. आता या प्रस्तावाला शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. वाढीव आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजूर झाल्यास अधिक दज्रेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. आरोग्य सभापती सुधीर गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वी वाढीव लोकसंख्येनुसार जिल्ह्यात आठ उपकेंद्र मंजूर झाले होते. यापैकी वारा जहागीर, शेलू, कोळेगाव व येवता या चार उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले. रुई येथील उपकेंद्राचे बांधकाम सुरू, तर तोरनाळा येथे बांधकाम सुरू होणे बाकी आहे. वाशिम तालुक्यातील सुरकंडी बु. येथे जागा उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतने दिल्याने, सदर उपकेंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला.