Washim: खतांची साठेबाजी केल्यास दोषींची गय करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By सुनील काकडे | Published: October 28, 2023 06:53 PM2023-10-28T18:53:23+5:302023-10-28T18:54:51+5:30
Washim: सध्या सुरू झालेल्या रब्बी हंगामात कृषी यंत्रणेने शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात कुठेही खतांची साठेबाजी होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरवावे.
- सुनील काकडे
वाशिम - सध्या सुरू झालेल्या रब्बी हंगामात कृषी यंत्रणेने शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात कुठेही खतांची साठेबाजी होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरवावे. असा प्रकार आढळल्यास कृषी यंत्रणांनी गाफील न राहता दोषींची गय करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.
२७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, मोहीम अधिकारी भागडे, सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, रासायनिक खत कंपनीचे प्रतिनिधी, खते व बियाणे विक्रेत्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी म्हणाल्या, सर्व खत विक्रेत्या कंपन्यानी खताचा पुरवठा नियोजनानुसार वेळेत करावा. रब्बी हंगामात किती खत पुरवठा करणार, याबाबतचे नियोजन दोन दिवसांत तातडीने सादर करावे. निविष्ठा विक्रेत्यांनी देखील बोगस मटेरियल कंपन्यांकडून स्वीकारू नये. रास्त भावात खते-बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. कोणी खताची जास्त दराने विक्री करित असल्याच्या निदर्शनास येताच कृषी विभागाने तात्काळ ठोस कारवाई करावी. त्यात कुणाचीही गय होता कामा नये. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आवश्यक तेवढे खत व बियाणे कसे उपलब्ध होईल, याचे चोख नियोजन कृषी विभाग, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी व विक्रेत्यांनी करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. जिल्ह्यात सध्या उपलब्ध खत आणि बियाण्यांसंदर्भात गिरी यांनी माहिती दिली.