वाशिम : दिशाभूल करणा-या रोजगार सेवकाची चौकशी करा - ब्रम्हा येथील ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 07:02 PM2017-12-19T19:02:02+5:302017-12-19T19:22:23+5:30
ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोजगार हमी योजना विभाग, तहसील कार्यालय आदींकडे १९ डिसेंबर रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोजगार हमी योजना विभाग, तहसील कार्यालय आदींकडे १९ डिसेंबर रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात पुढे नमूद आहे, की ब्रम्हा येथील रोजगार सेवक इंगळे हे गावक-यांकडे घरकुल, शौचालय मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी करतात. गरजूंना हेतुपुरस्सर वंचित ठेवून आपल्या मर्जीतील लोकांनाच रोजगार उपलब्ध करून देतात. १४ व्या वित्त आयोगातील निधीत अपहार केल्यामुळे संबंधित रोजगाराविरूद्ध अनसिंग पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. एकूणच या सर्व बाबींची तडकाफडकी दखल घेवून रोजगार सेवक इंगळे यांच्या कामाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. त्यावर गावातील हरीभाऊ इंगळे, यादव रणखांब, अरविंद इंगळे, प्रल्हाद मोरे, सिताराम कांबळे, विलास इंगळे, अनिल मोरे, संदिप भिसे, देवानंद कांबळे, शोभा पडघान, बबन खंदारे, सिद्धार्थ केदार, प्रताप कांबळे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.