वाशिम : लाच प्रकरणी कनिष्ठ अभियंता, लिपिकास तीन वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:37 AM2018-04-07T00:37:21+5:302018-04-07T00:37:21+5:30
वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता प्रमोद कळंबे व लिपिक दिनकर वानखडे या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के. गौर यांनी ६ एप्रिल रोजी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव तालुक्यातील वाकद येथील शेतकरी पांडूरंग बळीराम जाधव यांनी ८ जून २०१० रोजी सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत जाधव यांनी नमूद केले होते की, शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या शेतात विहीर खोदकामासाठी १ लाख रुपये मंजूर केले होते. या रक्कमेपैकी १० हजार, २५ हजार व ३५ हजार रुपयाचे असे तीन धनादेश आपल्याला सुरुवातीला मिळाले. त्यानंतर २५ हजार रुपयाचा चवथा धनदेश मंजूर झाल्यानंतर सदर धनादेशाबाबत कनिष्ठ अभियंता कळंबे यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी लिपिक दिनकर वानखडे यांच्याकडे २ हजार रुपये द्या व धनादेश घेवून जा, असे म्हटले. याबाबत लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता लिपिक वानखडे यास २२०० रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर कळंबे यांनाही अटक करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते.या प्रकरणात विद्यमान न्यायालयाने एकूण ४ साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने विद्यमान न्यायाधिश गौर यांनी आरोपी प्रमोद कळंबे व दिनकर वानखडे या दोघांना कलम ७ व १३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपयाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.