Washim: मतदानादरम्यान कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘खाकी’ सज्ज, ३०३३ पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात
By संतोष वानखडे | Published: April 25, 2024 02:45 PM2024-04-25T14:45:04+5:302024-04-25T14:45:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ‘खाकी’ सज्ज झाली आहे.
- संतोष वानखडे
वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ‘खाकी’ सज्ज झाली असून, जिल्ह्यात ३०३३ पोलिस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील १०७६ मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबतच सीआयएसएफ आणि केरळ एसाआरपीकडून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सोशल मीडियावरदेखील सायबर सेलचे विशेष लक्ष राहणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे वर्तण कोणीही करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, नियमाचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले.
इतर जिल्ह्यातूनही मनुष्यबळ
मतदान प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये म्हणून इतर जिल्हयातून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे ग्रामीण, गोंदिया, सोलापूर, अहमदनगर, सीआयएसएफ आणि केरळ येथून बंदोबस्तासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाले.
वाशिम जिल्हा पोलीस बंदोबस्त
- जिल्हा पोलिस अधीक्षक - ०१
- अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक - ०१
- पोलीस उपधीक्षक - ०१
- पोलिस निरीक्षक - १७
- सहायक पोलीस निरीक्षक - १०३
- पोलीस कॉन्सटेबल - १७६०
- होमगार्ड - ११५०