वाशिम : सामाजिक सभागृहात चालतोय किन्हीराजा पोलिस चौकीचा कारभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 07:31 PM2017-12-25T19:31:31+5:302017-12-25T19:35:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे स्वच्छतागृहाची सोय नसल्याने पोलिस चौकीमधील कर्मचा-यांना उघड्यावरच शौचविधी उरकावा लागतो.
४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या एका खोलीत सुरू झालेली किन्हीराजा येथील पोलिस मध्यंतरी सामाजिक सभागृहात हलविण्यात आली. त्याठिकाणी १० बाय १५ च्या एका खोलीत पोलिसांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या चौकीअंतर्गत येणा-या ४२ गावांपैकी काही गावे अत्यंत संवेदनशिल असून पोलिस कर्मचा-यांना सदोदित तत्पर राहावे लागते. याशिवाय ही चौकी औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अधुनमधून घडणा-या अपघातांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे किन्हीराजात सुसज्ज पोलिस चौकी असणे नितांत गरजेचे आहे. याकडे विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.