वाशिम : पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींकडून ‘भाडेवसूली’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 07:23 PM2018-01-28T19:23:41+5:302018-01-28T19:24:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरांतर्गत रस्त्यांसह रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने उभी करायची आणि ती चक्क भाड्याने देवून अवैधरित्या वसूली करण्याचा प्रकार काही लोकांनी अवलंबिला आहे. हा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू असताना नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मुख्य रस्ते, हॉस्पिटलनजिकची मोकळी जागा, प्रशासकीय कार्यालयांशेजारच्या नगर परिषदेची मालकी असलेल्या मोकळ्या जागेवर शहरातील काही ठराविक लोकांनी अतिक्रमण केले असून टिनशेडची दुकाने उभी झाली आहेत. ही दुकाने इतरांना व्यवसाय करण्यासाठी चक्क भाडेतत्वावर देण्याचा ‘गोरखधंदा’ अलिकडच्या काळात चांगलाच फोफावला आहे. नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने या गंभीर प्रकारावर वेळीच निर्बंध लादणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदेची मालकी असलेल्या मोकळ्या जागांवर चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण करून दुकाने भाड्याने दिली जात असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून अशी अतिक्रमणे प्रथम प्राधान्याने हटविण्यात येतील.
- करन अग्रवाल, स्थापत्य अभियंता, अतिक्रमण व बांधकाम विभाग, नगर परिषद, वाशिम