वाशिमची बाजारपेठ बंद; वर्दळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 04:45 PM2020-09-21T16:45:28+5:302020-09-21T16:46:44+5:30
शहरांतील रस्त्यांवर नागरिक, वाहनधारकांची वर्दळ जनता कर्फ्यूच्या सहाव्या दिवशीही अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर रोजीही दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. एकिकडे बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे तर दुसरीकडे शहरांतील रस्त्यांवर नागरिक, वाहनधारकांची वर्दळ जनता कर्फ्यूच्या सहाव्या दिवशीही अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर रोजीही दिसून आली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांतर्फे यापूर्वी रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वाशिम शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून पहिल्यांदाच दोन्ही व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची हाक दिली. काही किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ सप्टेंबर रोजीदेखील जनता कर्फ्यूला व्यापाºयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे पादचारी, वाहनधारकांची प्रमुख रस्त्यांवर वर्दळ मात्र कायम असल्याचे दिसून आले. दुपारच्या सुमारास स्थानिक पाटणी चौकात काही वेळ वाहतुकही विस्कळीत झाली होती.
जनता कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस
वाशिम शहरात २२ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानंतर दुकानांची वेळ कमी करायची की पूर्वीसारखीच ठेवायची यासंदर्भात बैठक घेऊन दोन्ही व्यापारी मंडळ निर्णय घेणार आहेत.