तिसऱ्या दिवशीही वाशिमची बाजारपेठ बंद; कोट्यवधींची उलाढाल ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:30 PM2018-11-30T14:30:32+5:302018-11-30T14:31:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांनी २८ नोव्हेंबरपासून बाजारपेठ बंद ठेवली आहे. या वादावर शुक्रवारी दुपारपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणणे, पाटणी चौकातील वाहतुकीची कोंडी फोडणे आदी दृष्टिकोनातून खासगी पार्किंग व्यवस्था अंमलात आली आहे. या पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियम, अरेरावीची भाषा, विविध प्रकारचा माल घेऊन येणारी वाहने संबंधित माल उतरविण्यासाठी दुकानासमोर उभी राहताच ‘जॅमर’ लावणे आदी प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप करीत याविरोधात शहरातील व्यावसायिक संघटनांनी २८ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. २८ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास पाटणी चौकात काही वेळ रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहून २९ नोव्हेंबरलादेखील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मोटारसायकल रॅली काढून त्यानंतर जिल्हाधिकाºयांशी चर्चाही केली. मात्र, सकारात्मक तोडगा निघाला नसल्यामुळे ३० नोव्हेंबरलादेखील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शुक्रवारला व्यापाºयांनी मोटारसायकल रॅली काढून ही पार्किंग व्यवस्था बंद करण्याची एकमुखी मागणी केली.
दरम्यान, तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. व्यापारी आणि पार्किंग व्यवस्थापक यांच्यामधील वादाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. बाजारपेठ बंद असल्याने अत्यावश्यक ठरणाऱ्या वस्तू, साहित्याची खरेदी करण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा गैरसोय होत आहे. दोघांच्या वादात आम्हाला वेठीस का धरता? अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहेत.