वाशिम ‘एमआयडीसी’मध्ये २५ वर्षांत उभे झाले केवळ ११ उद्योग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 05:38 PM2018-12-02T17:38:19+5:302018-12-02T17:38:30+5:30
वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या वाशिम-हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात आहे. त्यावर ९७ भुखंड पाडण्यात आले असून गेल्या २५ वर्षांत त्यापैकी केवळ ११ भुखंडांवर ११ उद्योग उभे होऊ शकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या वाशिम-हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात आहे. त्यावर ९७ भुखंड पाडण्यात आले असून गेल्या २५ वर्षांत त्यापैकी केवळ ११ भुखंडांवर ११ उद्योग उभे होऊ शकले. उर्वरित शेकडो एकर जागेवरील भुखंड विनावापर तसेच पडून आहेत. नियमानुसार ते परत घेवून इच्छुक उद्योजकांना देण्याची कार्यवाही व्हायला हवी. मात्र, सदर प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त कोट्यवधी रुपये खर्चून चकचकीत रस्ते, आवश्यक त्या सर्व ठिकाणी विद्यूत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नजिकच्या धरणावरून पाणी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याऊपरही ‘एमआयडीसी’त घेवून ठेवलेले भुखंड बांधून त्यावर उद्योग सुरू करण्याबाबत अनेकांमधून उदासिनता बाळगली जात आहे. दरम्यान, भुखंडांवर उद्योग सुरू न केल्यास दर पाच वर्षानंतर भुखंड परत घेवून त्याचा पुन्हा लिलाव करण्याची पद्धत आहे. मात्र, त्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नव्या उद्योजकांची इच्छा असूनही आणि शेकडो एकर जागा विनावापर पडून असताना भुखंड मिळणे अशक्य झाल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.
वाशिममध्ये उद्योजकांसाठी पोषक स्थिती!
हैद्राबाद, नांदेड, अकोला, खंडवा, इंदूर, अमृतसर, पुणे, पंढरपूर आदी मोठ्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला आहे. याशिवाय आंध्रप्रदेशची सीमादेखील वाशिमपासून काहीच किलोमिटर अंतरावर आहे. मोठे उद्योजक व उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्िचतपणे पोषक ठरणारी आहे. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासंबंधीचा प्रचार-प्रसार होणे तद्वतच विनावापर पडून असलेल्या भुखंडांची फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणे आवश्यक ठरत आहे.