वाशिम : जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 04:14 PM2018-02-10T16:14:08+5:302018-02-10T16:17:28+5:30
इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे.
इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असून, जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी पाणी सोडण्यात येत असल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जिल्ह्यात आधीच पाणीटंचाई असताना संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी मैलाची भटकंती करीत आहेत.
अडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्यावतीने या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले; परंतु गेल्या ३ महिन्यांपासून केवळ इंझोरी येथील कामच अद्याप पूर्ण झाले नसून, या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे. सतत सोडण्यात येत असलेल्या या पाण्यामुळे गावातील रस्ते जलयम होत असून, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. अडाण प्रकल्पाची पातळी आधीच खालावली असल्याने या प्रकल्पावरील शेतकºयांच्या जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जनतेला करण्यात आले आहे. दुसरीकडे केवळ जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या नावाखाली लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने ग्रामस्थ मैलभर पायदळ जात शेतामधून पाणी आणून आपल्या गरजा भागवित असताना जीवन प्राधीकरण मात्र त्याची दखल घेत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाºयांसह कंत्राटदारांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.