वाशिम : नव्याकोऱ्या रुग्णालय इमारती शोभेच्या वास्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:34 PM2019-09-23T13:34:32+5:302019-09-23T13:34:37+5:30

आरोग्य केंद्राची इमारत आकारास आली; मात्र, ही रुग्णालये रुग्णसेवेत कार्यान्वित होण्यास प्रचंड विलंब लागत आहे.

Washim: New hospital buildings not in use | वाशिम : नव्याकोऱ्या रुग्णालय इमारती शोभेच्या वास्तू!

वाशिम : नव्याकोऱ्या रुग्णालय इमारती शोभेच्या वास्तू!

googlenewsNext

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुरेशा मनुष्यबळाअभावी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बहुतांशी खिळखिळी झाली आहे. तब्बल ३१ कोटी रुपये खर्चून वाशिम येथे स्त्री रुग्णालय, कारंजात उपजिल्हा रुग्णालय, शिरपूरात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आकारास आली; मात्र, ही रुग्णालये रुग्णसेवेत कार्यान्वित होण्यास प्रचंड विलंब लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय उदासिनतेमुळे नव्याकोºया या इमारती आतून, बाहेरून धूळीच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणखी किमान दीड महिना तरी हा प्रश्न रेंगाळत राहणार आहे.
सन २००९-१० मध्ये मंजूर झालेल्या १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे बांधकाम वाशिम येथील चिखली सुर्वे या गावाकडे जाणाºया रस्त्यावर सन २०१२ पासून सुरू झाले. २१ कोटी रुपयांचा खर्च करून ही इमारत पूर्ण करण्यात आली. १४ फेब्रूवारी २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आॅनलाईन’ पद्धतीने या रुग्णालयाचे लोकार्पण केल्याचे भासविण्यात आले; मात्र हे रुग्णालय रुग्णसेवेत अद्यापही कार्यान्वित झालेले नाही. रुग्णालयासाठी नेमलेले दोन वैद्यकीय अधिकारी आणि काही परिचारिका सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देत आहेत. रुग्णालयासाठी आणखी बरेच मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी, विद्यमान आमदार लखन मलिक यांनी विशेष लक्ष पुरवायला हवे होते; परंतु तसे न झाल्याने हा प्रश्न निकाली निघाला नाही. कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती देखील जवळपास अशीच आहे. ७.९९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे रुग्णालय देखील अद्यापपर्यंत पूर्ण दिमतीने रुग्णसेवेत कार्यान्वित झालेले नाही. पुरेसे मनुष्यबळ नसण्यासह अन्य प्रकारच्या विविध सुविधांची वाणवा असल्याने टोलेजंग इमारत उभी होऊनही रुग्णांची गैरसोय दुर झालेली नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी या प्रश्नाकडे लक्ष पुरवायला हवे होते, असा सूर जनतेतून उमटत आहे. शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथेही ३ कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले; मात्र लोकार्पण झाले नसल्याने जुन्याच इमारतीत रुग्णसेवा सुरू असून अपेक्षित मनुष्यबळ आणि अन्य सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमीत झनक यांचा याकामी पाठपुरावा कमी पडल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.


बंद इमारतीत साचली कबुतरांची विष्ठा
वाशिमच्या स्त्री रुग्णालय परिसरात सर्वत्र गवत व झाडेझुडपे उगवली असून आतमध्ये प्रचंड प्रमाणात धुळ व कबुतरांची विष्ठा साचून असल्याचे पाहावयास मिळाले. नजिकच असलेल्या नर्सींग कॉलेजच्या टोलेजंग इमारतीतही सर्वत्र धूळ साचत असून शासनाच्या निधीचा बहुतांशी अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.


वाशिम येथे स्त्री रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र या रुग्णालयासाठी आवश्यक असलेले डॉक्टर व अन्य कर्मचारी अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. काही डॉक्टर व परिचारिकांची नेमणूक झाली, ते सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देत आहेत.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Washim: New hospital buildings not in use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.