‘आॅनलाईन’अभावी निराधार लाभार्थींचे पोस्टातील खाते होणार बंद, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते सुरू करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:52 PM2018-08-23T20:52:13+5:302018-08-23T20:52:30+5:30
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
वाशिम - संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाºया विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मात्र, पोस्टात अशाप्रकारची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने लाभार्थींनी पोस्टातील खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार व अन्य ६ योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यांमध्येच वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने लाभार्थ्यांनी आपले पोस्टातील खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते सुरू करावे व तसा खातेक्रमांक सादर करावा, जेणेकरुन अनुदान वितरित करण्यास अडचण जाणार नाही. लाभार्थ्यांनी बँकेचा खातेक्रमांक सादर न केल्यास व त्यांचे अनुदान न मिळाल्यास त्याला संजय गांधी निराधार योजना विभाग जबाबदार राहणार नाही, असे वाशिमचे निवासी नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) साहेबराव नप्ते यांनी कळविले आहे.
निराधार योजना समितीची बैठक २५ सप्टेंबरला!
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक २५ सप्टेंबरला आयोजित केली असून, १२ सप्टेंबरपर्यंत सेतु केंद्रामार्फत लाभार्थींचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी सेतु केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज केला, त्यांनी स्वत:चे मुळ आधारकार्ड घेऊन त्याचदिवशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आधारकार्ड स्कॅन करुन घ्यावे, असे आवाहन नायब तहसीलदार नप्ते यांनी केले.