Washim: शिष्यवृत्तीचे नो टेन्शन; आता ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज! पुन्हा मिळाली मुदतवाढ
By दिनेश पठाडे | Published: August 19, 2023 07:03 PM2023-08-19T19:03:24+5:302023-08-19T19:04:57+5:30
Washim: समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.
- दिनेश पठाडे
वाशिम - समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. नवीन अर्ज, नुतनीकरण आणि प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली असून ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाइन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील नवीन प्रवेशित व २०२१-२२ मधील नुतनीकरणाचे अर्ज स्वीकारण्यास महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची मुदत सुरुवातीला ३१ मार्च होती. त्यानंतर ३० एप्रिल, ३१ मे, ३० जून आणि त्यानंतर ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. यानंतर मुदतवाढ मिळते की नाही, याकडे लक्ष लागले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदतवाढीबाबत कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली होती. मात्र, शिष्यवृत्ती लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, या शासनाच्या धोरणानुसार पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
२१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील एकूण २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या मुदतीत अर्ज केले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने अर्ज संख्येत भर पडणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयस्तरावर जवळपास २ हजार अर्ज प्रलंबित आहेत