वाशिम : अर्धवट ‘घरकुल’ बांधणार्या १५00 जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:30 AM2017-12-28T02:30:02+5:302017-12-28T02:30:36+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.
दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली. दारिद्रय़रेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे (डीआरडीए) ही योजना राबविली जाते. रमाई घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत शेकडो लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, २0१३-१४ पासून ते आजतागायत अनेक लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले नाही. यासंदर्भात १६ नोव्हेंबर २0१७ रोजी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर घरकुल योजना गांभीर्याने घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ‘अँक्शन प्लॅन’ तयार करून अर्धवट घरकुलांची शोध मोहीम जिल्हाभर राबविली.
जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांचा आढावा घेऊन लाभार्थींच्या समस्या जाणून घ्या आणि घरकुलांची कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावरून जवळपास १५00 लाभार्थींना नोटीस बजावून घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थींना आता नोटीस प्राप्त होत असून, घरकुल बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत रेतीघाट लिलाव रखडल्याने बांधकामात रेतीचा व्यत्यय निर्माण होत असल्याचा दावा काही लाभार्थींनी केला. या सत्रात बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागावे अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा लाभार्थींना देण्यात आला. विहित मुदतीत बांधकाम पूर्ण न झाल्यास अनुदानाची रक्कम वसूल करणे किंवा फौजदारी कारवाई आदीचा विचार केला जाणार आहे.
अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली होती. घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणार्या लाभार्थींना नोटीस बजावून विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लाभार्थींनीदेखील विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- नितीन माने
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम.