वाशिम : १३०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:13 AM2020-07-31T11:13:17+5:302020-07-31T11:13:34+5:30
पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
- संतोष वानखडे/ दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आणि आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे याची सांगड घातली असता, १३०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी असल्याने आवश्यक सुविधा पुरविण्यात आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. ४४९ रिक्त पदे , पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालय, २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय मंजूर असून, अद्याप ते कार्यान्वित झाले नाही. जिल्ह्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण १४४९ पदे मंजूर असून, यापैकी ४४९ पदे रिक्त असल्याने एक हजार अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २८ हजाराच्या घरात असल्याने एका कर्मचाºयावर सरासरी १३०० लोकांच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुरा निधी, याशिवाय पुरेशा प्रमाणात नसलेल्या भौतिक सुविधा यामुळे कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. साधारणत: जीडीपीच्या ९ टक्के खर्च हा आरोग्यावर केला जावा, असा संकेत आहे. जिल्ह्यात जीडीपीच्या ०.६० टक्के खर्च हा आरोग्यावर होतो, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तसेच शासनाकडून आरोग्य विभागाला प्राप्त निधीमधून जवळपास ८५ ते ९० टक्के निधी खर्च होतो. जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असल्याने गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळत असल्याचे दिसून येते. १०० खाटांचे जिल्हा स्त्री रुग्णालय मंजूर असून, भव्य इमारत बांधकामही झाले. परंतू, अद्याप लोकार्पण झाले नाही. यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होत आहे.
सेवा देण्यावर भर
ग्रामविकास विभागांतर्गत येत असलेली गट क व ड संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हास्तरीय सहायक पदे, वर्ग एक व वर्ग दोनही काही पदे रिक्त असल्याने सेवा देताना काही प्रमाणात अडचणी येतात. उपलब्ध मनुष्यबळानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम
कर्तव्य नियोजनावर भर
सद्यस्थितीत जिल्ह्यात आमच्याकडे ५९९ पैकी २८५ विविध पदे रिक्त आहेत. त्यात काही महत्त्वाच्या पदांचाही समावेश आहे. यामुळे अडचणीत येत आहेत; परंतु उपलब्ध मनुष्य बळाचा नियोजनपूर्वक वापर करून कोरोना संसर्गाशी लढा देण्याचे आमचे प्रयत्न सुंरू आहेत. त्यात सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वेळेत शोधून त्यांचेवर उपचार करणे शक्य होत आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्यचिकित्सक