वाशिम: कोरोनाविरूद्ध लढ्यास पॅरामेडिकल स्टाफ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:11 AM2020-04-11T11:11:02+5:302020-04-11T11:11:09+5:30
पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीला गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांनाही घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूच्या जिल्ह्यातील ३ एप्रिल रोजीच्या प्रवेशानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या असून, पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीला गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांनाही घेण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून, आरोग्य यंत्रणा कुठे कमी पडू नये म्हणून आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी यापूर्वीच दिला आहे. जिल्हा परिषद कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथून या सर्व स्टाफचे नियंत्रण केले जात आहे. आशा स्वयंसेविका ९७६, गट प्रवर्तक ४८, अंगणवाडी सेविका १०७६, आरोग्य सेवक व सेविका १६५४, वैद्यकीय अधिकारी ३५० या स्टाफच्या भरवशावर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात तळ ठोकून आहे. मेडशी येथील परिस्थितीत सुधारणा आहे.
वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागातील असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर लक्ष केंद्रीत करीत सर्व अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचा आदेश दिला. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मेडशीत तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक त्या औषधीचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी १० एप्रिल रोजी सांगितले.
अंगणवाडी सेविकाही दिमतीला
गावोगावी सर्वे करणे, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्याकामी अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात आली आहे. या कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या तसेच आणखी आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.