वाशिम : पोलीस प्रशासनाच्या 'सेवां'ना मिळणार ऑनलाईनची जोड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:13 PM2018-01-24T14:13:27+5:302018-01-24T14:14:57+5:30
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र, तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची (एफआयआर)ची प्रत पुरविणे, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणे, सभा-संमेलने, मिरवणूक, शोभायात्रा इत्यादींना परवाने देणे, विदेशी नागरिकांचे नागरिकत्वाचे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविणे, पारपत्र पडताळणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार, इत्यादीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, कागदपत्रे साक्षांकित करणे आदी १७ सेवांचा समावेश आहे. या सेवा पोलीस दलातर्फे ऑनलाईन पुरविण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे कामात एकसूत्रता येणार असून पोलिसांचा व नागरिकांचा वेळही वाचेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला. सदर सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गोपनीय शाखेचे काम पाहणारे सर्व कर्मचारी यांना महाऑनलाईनमार्फत जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांच्यामार्फत प्रशिक्षणही देण्यात आले.
ऑनलाईन सेवांमध्ये विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी मिळणार आहे. या सुविधा ऑनलाईन असल्याने प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरिकांना रांगा लावण्याची किंवा संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. www.aaplesarkar.mahaononline.gov.in या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्याला आवश्यक सेवांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती मिळणार आहे. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र नागरिकांना प्राप्त होणार आहे. उपरोक्त १७ सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी फक्त ऑनलाइन स्वरुपातच अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले.