वाशिम : घरं मोडकळीस आल्यानं पोलिसांना राहावं लागतंय भाड्याच्या घरांमध्ये, शासनाचं दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 03:57 PM2018-02-17T15:57:07+5:302018-02-17T15:59:51+5:30
ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
वाशिम - ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील हा प्रकार आहे. शासनाने त्यांना दिलेल्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणची निवासस्थानं तर अक्षरशः मोडकळीस आली आहेत. परिणामी पोलीस कर्मचा-यांना नाईलाजास्तव भाड्यांच्या घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
शिरपूरजैन (मालेगाव) येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित असून आसपासच्या 50 हून अधिक गावामधील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी येथील पोलिसांना पार पाडावी लागते. यामुळे मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शासनाने पोलीस कर्मचा-यांना बांधून दिलेली घरे सद्यस्थितीत अत्यंत जुनाट झाली असून त्यात वास्तव्य करणे धोकादायक ठरले आहे.
परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून निवासस्थाने सोडून पोलीस कर्मचा-यांनी भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करणे पसंत केले आहे. यामुळेच काही कर्मचारी मालेगाव येथे वास्तव्याला असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मोडकळीस आलेली निवासस्थाने पाडून त्याठिकाणी नव्याने निवासस्थाने उभारावीत, अशी मागणी जोर धरत आहे.