Washim: पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव मागविले; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, कृषी विभागावर जबाबदारी
By संतोष वानखडे | Published: January 1, 2024 06:03 PM2024-01-01T18:03:50+5:302024-01-01T18:04:14+5:30
Washim News: शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सोय उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत ठरावांसह पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव कृषी अधिकाऱ्यांमार्फत मागविले आहेत.
- संतोष वानखडे
वाशिम : शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सोय उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत ठरावांसह पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव कृषी अधिकाऱ्यांमार्फत मागविले आहेत. यामुळे नववर्षात पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरीता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, दीर्ष कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाट सुकर करण्यासाठी सेस फंडातून निधी उभारण्यावर मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत एकमत झाले. याशिवाय विशेष बाब म्हणून शासनाकडून निधी खेचून आणण्याचे प्रयत्नही जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चालविले आहेत.
जिल्ह्यात नेमके किती पाणंद रस्त्यांची मागणी आहे, याचा निश्चित आकडा समोर येण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलनिहाय पाणंद रस्त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले आहेत. कृषी अधिकारी तथा कृषी विस्तार अधिकारी यांच्यामार्फत गावनिहाय, जिल्हा परिषद सर्कलनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. पाणंद रस्त्यांची माहिती मागविण्यात आल्याने नववर्षात पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत मिळत आहेत.