वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग मानोरा येथे स्थानांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:23 PM2018-09-08T14:23:41+5:302018-09-08T14:24:04+5:30
वाशिम: सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. या उपविभागाचे नाव आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मानोरा असे करण्यात आले आहे. हे कार्यालय मानोरा येथे कार्यान्वितही करण्यात आले आहे. मानोरा येथे इमारत नसल्याने हे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत कार्यरत आहे. परंतु, सद्यस्थितीत ही इमारत नादुरुस्त असून इमारतीमध्ये नवीन विद्युत मीटर बसविण्यासह इतर डागडुजीसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
नव्याने शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट रस्ते व इमारतीची कामे, पोहरादेवी विकास आराखड्याची कामे, नगरपंचायत मानोरा प्रशासकीय इमारतीचे काम आदी कामांची अंदाजपत्रके बनविण, ई-निविदा प्रपत्रे तयार करणे ही कामे तातडीच्या स्वरुपाची असल्याने या कार्यालयाचे कामकाज विश्रामगृह मानोरा येथून व संगणकावर करावयाची अंदाजपत्रके/निविदा प्रपत्रे ही कामे वाशिम येथील पूर्वीच्या कार्यालयीन इमारतीमधून उपलब्ध असलेल्या संगणकाद्वारे करण्यात येत आहेत. ७ सप्टेंबर पासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व दस्तावेज मानोरा येथे स्थानांतरीत करण्यात आले असून सदर कार्यालयाचे कामकाज मानोरा येथून तात्पुरत्या स्वरुपात शाखा अभियंता यांचे निवासस्थानाच्या इमारतीमधून सुरु करण्यात आले आहे. वीज पुरवठ्यासह इमारतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर कार्यालय पूर्ण स्वरुपात कार्यान्वित होईल. सदर कार्यालयासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.