वाशिम: कार्ली येथे ‘क्वारंटीन’ असलेल्या इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:14 AM2020-06-23T11:14:51+5:302020-06-23T11:14:59+5:30
प्रकृती अचानक बिघडल्याने २१ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ली : मुंबईवरून पाच दिवसांपूर्वी आपल्या कार्ली (ता.वाशिम) या गावी परत आलेले तसेच जिल्हा परिषद शाळेत ‘क्वारंटीन’ म्हणून राहत असलेल्या एका ५५ वर्षीय इसमाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि प्रकृती अचानक बिघडल्याने २१ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला. महसूल, आरोग्य, ग्राम पंचायत प्रशासनाने तातडीने या घटनेची नोंद घेत आवश्यक त्या सुरक्षिततेत सदर इसमावर रविवारी रात्रीच अंतिम संस्कार केले.
कार्ली येथील ५५ वर्षीय इसम हा पत्नीसह मुंबईवरून गावी परतले. ते क्वारंटीन म्हणून राहत असताना, २१ जूनला सायंकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. अचानक प्रकृती बिघडल्याने त्याच त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या चमूने घटनास्थळ गाठले. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले तरी खबरदारीच्या उपाययोजना करून रात्री उशिरा मोजक्या लोकांच्या उपस्थित पीपीई किटच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील दोन जणांना क्वारंटीन केले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. (वार्ताहर)