वाशिम : २४६ महिला सरपंच पदांचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 11:13 AM2020-12-12T11:13:55+5:302020-12-12T11:16:42+5:30
Washim Gram panchayat Reservation २४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ११ डिसेंबर राेजी जाहीर करण्यात आला. कार्यक्रम जाहीर हाेताच निवडणूक हाेत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ४९० ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. ७ डिसेंबर व ११ डिसेंबर राेजी सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे.
सन २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता महिला आरक्षण सोडत ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी श्ण्मुखराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीमध्ये झाली. या सोडतीद्वारे जिल्ह्यातील एकूण ४९० ग्रामपंचायतींपैकी २४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
यापैकी अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ५०, अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ११० ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित राहणार आहे.
या आरक्षण सोडतीवेळी उप-जिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांच्यासह तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.जिल्हयातील ४९० ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला असून चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.
जाहीर आरक्षणाचा काहींना फटका
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची चर्चा आरक्षण जाहीर झाल्यानंतर ऐकावयास मिळाली. काही इच्छुक उमेदवारांनी तर ज्या क्षेत्रात निवडणूक लढायची तयारी केली हाेती ते आरक्षणच बदलल्याने केलेली मेहनत व्यर्थ गेली, तर काहींना अपेक्षित आरक्षण निघाल्याने फायद्याचे राहिले.