Washim: रजा घेऊन घरी परतला; अपघातात मृत्यू ओढवला, ट्रक-दुचाकी अपघातात धोत्रा येथील जवानाचा मृत्यू
By सुनील काकडे | Published: June 17, 2023 06:56 PM2023-06-17T18:56:58+5:302023-06-17T18:59:01+5:30
Washim: ट्रकने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात धोत्रा येथील रहिवासी तथा सैन्यदलात कार्यरत योगेश सुनील आढोळे (२४) या जवानाचा मृत्यू झाला.
- सुनील काकडे
वाशिम : ट्रकने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात धोत्रा येथील रहिवासी तथा सैन्यदलात कार्यरत योगेश सुनील आढोळे (२४) या जवानाचा मृत्यू झाला. ही घटना १६ जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पोटी फाट्यावर घडली. विशेष म्हणजे योगेश हा एक दिवसापूर्वीच रजा घेऊन गावी परतला होता.
युवराज मनवर (धोत्रा) यांनी यासंदर्भातील फिर्यादीत नमूद केले आहे की, १६ जून रोजी सांयकाळी पाच वाजता योगेश आढोळे हा दुचाकी वाहनाने (क्रमांक एम.एच. ३०, ए.एस. २८२१) कारंजा येथे गेला होता. रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मंगरूळपीर येथे नोकरीला असलेले लाईनमन सुनील भगत यांनी घरी येऊन योगेशचा अपघात झाल्याचे सांगितले. मंगरूळपीरवरून कारंजाकडे जाणाऱ्या एम.एच. २७, बी.एक्स. ११९१ क्रमांकाच्या ट्रकने योगेशच्या दुचाकी वाहनास जोरदार धडक मारली असून तो अपघातस्थळी बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे त्यांनी कळविले. त्यावरून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील योगेशला मंगरूळपीरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथील डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मंगरूळपीर पोलिसांनी ट्रक चालकावर भादंविचे कलम २७९, ३०४ ‘अ’, सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
जवानाप्रती प्रशासकीय यंत्रणेची उदासिनता
सैन्यदलात कार्यरत असल्याने मृतक योगेश सुनील आढोळे याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बंदूकीच्या फैरी झाडून विधीवत अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच झाले नाही. धोत्रा येथे त्याचे कुटूंब आणि गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याचे पाहावयास मिळाले.