वाशिमवासी स्वच्छतेसाठी रस्त्यावर
By Admin | Published: January 12, 2015 01:48 AM2015-01-12T01:48:07+5:302015-01-12T01:48:07+5:30
मारवाडी युवा मंचचा उपक्रमात विविध संघटनांचा पुढाकार.
वाशिम : वाशिम शहरामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विविध संघटनांच्यावतीने ११ जानेवारी रोजी शहरात संध्याकाळी ६ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात शहरवासीयांनी स्वच्छेने उतरून शहराची स्वच्छता केली. मारवाडी युवा मंचच्या उपक्रमास विविध संघटनांनी दिलेल्या पुढाकाराने हा उपक्रम अविरत सुरू ठेवण्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी ४00 च्यावर नागरिक सहभागी झाले होते. गत आठ दिवसांपासून मारवाडी युवा मंच विविध उपक्रम राबवून ११ जानेवारी रोजी आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाची माहिती शहरातील गणमान्य जनतेसह विविध संघटनांना देऊन पुढाकार घेण्याचे आवाहन करीत होती. आज ११ जानेवारी रोजी संध्याकाळी कार्यक्रमास सुरुवात झाल्याबरोबर मोठय़ा प्रमाणात शहरात गर्दी निर्माण होऊन सर्वत्र धूळ उडताना दिसून आली. स्वच्छता अभियानात सहभागी सर्वांंना पांढर्या रंगाच्या कॅप व तोंडाला रूमाल हातात खराटा देऊन सर्वांंनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारीही यात सहभागी झाले होते. शहरात वापरण्यात येत असलेल्या कचरा गाड्याद्वारे कचरा गावाबाहेर नेऊन टाकण्यात आला. शहरातील रस्त्यावर एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून, वाहतुकीस कोणत्याच प्रकारचा अडथळा येऊ नये याकरिता शहर वाहतूक शाखेच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच वाशिम शहर पोलीस स्टेशनच्यावतीने ही बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर उपक्रम आठवडयातून एक दिवस या प्रमाणात राबविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.