वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:41 PM2018-10-13T15:41:07+5:302018-10-13T15:41:10+5:30
एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक नगर परिषदेने शहरांतर्गत तथा रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषत: खोदलेल्या रस्त्यांवर ‘बोल्डर गिट्टा’ टाकण्यात आल्याने त्यावरून वाहने चालविणे अशक्य होत असून नगर परिषदेच्या या उदासिनतेप्रती शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाशिम शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शहराची व्याप्ती अधिक नसून मुख्य रस्त्यांची संख्या व त्यांची लांबी-रुंदी देखील मर्यादितच आहे. शहरात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान एकमेव मुख्य बाजारपेठ वसलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता नादुरूस्त होवून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या आधी ११ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषदेने या रस्त्याचे काम सुरू केले. यासाठी संपूर्ण रस्ता खोदून त्यावर ‘बोल्डर गिट्टा’ अंथरण्यात आला. मात्र, एक महिना उलटूनही रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरूवात देखील झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणच्या रस्ता कामांचीही अशीच स्थिती असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.
दिवसभर नव्हे; तर रात्रीच्या वेळी केले जाते थातूरमातूर काम!
जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केल्या जाणारे शिवाजी चौक ते पाटणी चौकादरम्यानच्या रस्ता नुतनीकरणाचे काम दिवसभर बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू केले जाते. यामुळे नागरिकांसोबतच नगर परिषदेच्या जबाबदार एकाही अधिकाºयाचे रस्ता कामाच्या दर्जावर विशेष नियंत्रण राहिलेले नाही. तथापि, रस्त्याचे काम रात्रीच्या सुमारास करण्याचा प्रकार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
वाशिम शहरातील शिवाजी चौक ते पाटणी चौक यादरम्यानच्या रस्त्यासह अन्य ठिकाणच्या कामांमधील दिरंगाई दुर करून कामाची गती वाढविण्यासंदर्भात कंत्राटदारांना सक्त निर्देश दिले जातील.
- गणेश शेट्टे
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम