साखरा जिल्हा परिषद शाळा राज्यात प्रथम; ५१ लाखांचे बक्षीस
By संतोष वानखडे | Published: March 3, 2024 04:59 PM2024-03-03T16:59:45+5:302024-03-03T17:00:24+5:30
मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियान.
संतोष वानखडे, वाशिम: मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियानांतर्गतच्या स्पर्धेत सरकारी शाळा गटातून वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता.वाशिम) येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेने राज्यात ५१ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा या अभियानात राज्यातील १ लाख ३ हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविला होता. शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मुल्यांकन करण्यात आले. ३ मार्च रोजी बक्षिस जाहिर झाले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता.वाशिम) येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. मंगळवार, ५ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
राज्यात वाशिमचे नाव चमकले
मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियानात वाशिम जिल्ह्यातील शाळांची कामगिरी उत्कृष्ट राहावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश आहाळे यांनी शाळांना प्रोत्साहन दिले होते. साखरा शाळेचे मुख्याध्यापक राजू महाले यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून मेहनत घेतली. साखरा शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाल्याने, या मेहनत व परिश्रमाचे चीज झाले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात राज्यात वाशिमचे नाव चमकले आहे.