वाशिम : घरकुल योजनेच्या अनुदानात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:17 PM2019-08-16T14:17:11+5:302019-08-16T14:17:25+5:30

घरकुलांचा हा अनुदान घोटाळा लाखोंच्या घरात असून, बोगस लाभार्थी, ग्रामसेवक, कंत्राटी अभियंत्यांसह अनेकजण कारवाईच्या रडारवर आहेत.

 WASHIM: Scam in subsidy of Gharkul scheme | वाशिम : घरकुल योजनेच्या अनुदानात घोटाळा

वाशिम : घरकुल योजनेच्या अनुदानात घोटाळा

googlenewsNext


संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात अनेक लाभार्थीला घरकुल अनुदानाचा दुबार लाभ तसेच पक्के घर असतानाही परत घरकुलाचा लाभ दिल्याची प्रकरणे समोर येत असून, याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. घरकुलांचा हा अनुदान घोटाळा लाखोंच्या घरात असून, बोगस लाभार्थी, ग्रामसेवक, कंत्राटी अभियंत्यांसह अनेकजण कारवाईच्या रडारवर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासह घरकुलासंदर्भात विविध योजना राबविल्या जात आहेत. पात्र लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. काही ठिकाणी घरकुल अनुदानाचा लाभ देताना गैरप्रकार, अनियमितता झाल्याच्या तक्रारी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कळंबा बोडखे ता. मंगरूळपीर येथील तक्रारीत तथ्य आढळून आले असून, घरकुल अनुदान वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर व भेरा येथेही घरकुल मंजूर नसताना अनुदानाचा लाभ दिल्याचे स्पष्ट झाले. कोठा ता. मालेगाव येथेही यापूर्वी घरकुलांचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थींना पुन्हा घरकुल अनुदानाचा लाभ दिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दीपक कुमार मीना यांनी मालेगाव गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पक्के घर असतानाही काही लाभार्थींनी घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेतल्याच्या तीन ते चार तक्रारी असून त्याअनुषंगानेदेखील चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे बोगस लाभार्थी आणि या अनुदान घोटाळ्यात सहभागी घटकांचे धाबे दणाणले आहेत.


शिरपूर, भेरा येथील घरकुल अनुदानाची रक्कम वसूल
घरकुल अनुदान वाटपात गैरप्रकार आढळून आल्याने आतापर्यंत दोन ग्रामसेवक व दोन कंत्राटी अभियंत्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. शिरपूर व भेरा येथील घरकूलाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी इतरांच्या बँक खात्यांवर जमा झालेली घरकुलाची रक्कम संबंधित लाभार्थींकडून वसुल करून शासन जमा करण्यात आली. यानंतर पात्र लाभार्थींकडून रीतसर अर्ज मागवून त्यांना घरकुल योजनेचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
दरम्यान, सीईओ मीना यांनी घरकुल अनुदान वाटपासंदर्भात तक्रारी मागविल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून, अनुदान घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title:  WASHIM: Scam in subsidy of Gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.