वाशिम : दुसऱ्या लाटेत १५ गावांनी वेशीवरच रोखले कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:21 PM2021-06-17T12:21:01+5:302021-06-17T12:21:08+5:30

Washim News : प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले.

Washim: In the second wave, 15 villages stopped Corona at the gate | वाशिम : दुसऱ्या लाटेत १५ गावांनी वेशीवरच रोखले कोरोनाला

वाशिम : दुसऱ्या लाटेत १५ गावांनी वेशीवरच रोखले कोरोनाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातही चांगलेच हातपाय पसरले; मात्र  प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. दुसरी लाट ओसरत असली तरी यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा मनोदय ग्रामपंचायतींनी व्यक्त केला.
देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ग्रामीण भागात आढळला होता. पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील जनजीवन फारसे प्रभावित झाले नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ७१४३ रुग्ण आढळून आले तर १५४ जणांचा मृृत्यू झाला. 
फेब्रुवारी २०२१ च्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात दुसरी लाट आली. शहरासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. मार्च ते मे या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यात ७९० च्या आसपास गावे असून १५ गावांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. कारंजा तालुक्यातील जामठी, मजलापूर, शिंगणापूर, जलालपूर, वाहितखेड, रिसोड तालुक्यातील जायखेड, सरपखेड, मोरगव्हाण, वाशिम तालुक्यातील भोयता, मानोरा तालुक्यातील डोंगरगाव, मंगरूळपीर तालुक्यातील खरबी, अंबापूर, खेर्डा खु., एकांबा, रुई आदी १५ गावांनी कोरोना वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, गावकऱ्यांचे सहकार्य, परजिल्हा, परगावावरून आलेल्या नागरिकांची गावाबाहेरच तपासणी, नियमित निर्जंतुकीकरण, कोरोनाबाधित गावांतील नागरिकांचा थेट संपर्क टाळणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर, कोरोना लसीकरण, आरोग्य विभागासह तालुका, जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी मार्गदर्शन या बळावर हे शक्य झाले आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, आवश्यक ती दक्षता घेण्याचा मनोदय १५ गावांनी व्यक्त केला. 

Web Title: Washim: In the second wave, 15 villages stopped Corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.