Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात!
By सुनील काकडे | Published: October 27, 2023 08:52 PM2023-10-27T20:52:15+5:302023-10-27T20:52:26+5:30
Washim News: घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली.
- सुनील काकडे
वाशिम - घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली. पोटी असलेली एक मुलगी आणि दोन मुलांचा सांभाळ करताना चेहऱ्यावरचे दु:ख कधीही दिसू दिले नाही; पण अवघ्या ३५व्या वर्षी तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या. किमान एक किडनी तरी ‘ट्रान्सप्लान्ट’ करावी लागेल, असे डाॅक्टरांनी सांगितले; मात्र महत्प्रयास करूनही त्याला अद्याप यश आलेले नाही. सध्या वनमालाबाई ‘डायलिसीस’वर असून पती आणि वडील तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करित आहेत.
शहरातील शुक्रवारपेठ भागातील राजनी चाैकात वास्तव्यास असलेले विठ्ठल इंगळे यांची मुलगी वनमालाबाई यांचा विवाह मंगरूळपीर येथील घनश्याम खिराडे यांच्याशी साधारणत: १८ वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर या दाम्पत्यास एक मुलगी आणि दोन मुले झाली. मुलगी विवाहयोग्य झाली असून दोन मुले सध्या लहान आहेत. वनमालाबाईंचे पती घनश्याम हे मिळेल तिथे रोजंदारीने मजूरीचे काम करतात. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. परिणामी, पाच सदस्यांच्या कुटूंबाचे पालनपोषण करताना नाकीनऊ येतात. अशात वनमालाबाईंना वर्षभरापूर्वी पोटात दुखत असल्याचे जाणवले.
कालांतराने त्रास अधिकच बळावत गेला. उपचार सुरू होते; मात्र त्याचा प्रभाव दिसून आला नाही. दोन महिन्यांपूर्वी त्रास अधिकच वाढल्याने अखेर वडील विठ्ठल इंगळे यांनी वनमालाबाईंना मुंबई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे विविध चाचण्या केल्यानंतर तिच्या दोन्ही किडनी निकाली झाल्याची बाब निष्पन्न झाली.
दोन्ही नाही; पण किमान एका किडनीचे तरी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे; अन्यथा वनमालाबाईंना वाचविता येणे अशक्य असल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले आहे. मात्र, महत्प्रयास करूनही किडनी मिळाली नसल्याने ‘डायलिसीस’वर असलेल्या वनमालाबाईंची प्रकृती ढासळत चालल्याने कुटूंबियांची चिंता वाढली आहे.