वाशिम मध्ये शिवजयंती उत्साहात; सद्भावना रॅली, लेझिम पथकाने वेधले लक्ष
By संतोष वानखडे | Published: February 19, 2024 04:48 PM2024-02-19T16:48:43+5:302024-02-19T16:50:16+5:30
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला वाशिम शहरासह जिल्हाभरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
संतोष वानखडे, वाशिम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला वाशिम शहरासह जिल्हाभरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथून मोटर सायकल सद्भावना रॅलीला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघाली. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक व सर्व सामाजिक संघटनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. भगव्या झेंड्यांनी शहर लखलखले तर छत्रपती शिवरायांच्या जयजयकरांनी दुमदुमले.
मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा शहरासह ग्रामीण भागातही रॅली काढण्यात आली. मालेगावात मुलींच्या लेझिम पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत महिलांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. वाशिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सकल समाजबांधवांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.