वाशिम : पोषण आहाराच्या वजनात घोळ करणार्या बचत गटाला ‘कारणे दाखवा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:21 AM2018-02-01T01:21:41+5:302018-02-01T01:22:18+5:30
वाशिम: एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट असलेल्या सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाने पोषण आहार पाकिटांच्या वजनात घोळ केल्याची गंभीर बाब २८ जानेवारीला उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सदर बचत गटास मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून अहवाल सादर करण्यास तीन दिवसांची मुदत दिल्याची माहिती बुधवारी प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क

तालुक्यातील केकतउमरा येथील अंगणवाडी केंद्रात २८ जानेवारीला सुजाता स्वयंसहायता महिला बचत गट (वाशिम) यांच्याद्वारे पोषण आहाराचे वाटप सुरू होते. यावेळी पंचांच्या उपस्थितीत पोषण आहाराच्या पाकिटांचे वजन करण्यात आले असता, सर्वच प्रकारच्या पाककृतीमधील पोषण आहाराचे वजन ७00 ते ८00 ग्रॅमने कमी असल्याची बाब निष्पन्न झाली होती.
दरम्यान, ही माहिती अंगणवाडी कर्मचारी व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास यंत्रणेच्या अधिकार्यांना दिली. त्यानुसार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पंचनामा केला असता, पोषण आहाराच्या वजनात तफावत आढळून आली. त्यांनी यासंदर्भातील अहवाल महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.इंगळे यांच्याकडे सादर केला. दरम्यान, या अहवालानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे यांनी सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटास मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला, बालकल्याण विभागासमोर चौकशीचे आव्हान!
सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाच्या माध्यमातून फेब्रुवारी २0१७ पासून वाशिम तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविला जात आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या वजनात नेमका कधीपासून घोळ केला जात आहे, याची सखोल चौकशी करण्याचे मोठे आव्हान महिला व बालकल्याण विभागासमोर उभे ठाकले आहे.