वाशिम : पंचायत राज समितीने पिंजून काढले जिल्ह्यातील सहा तालुके : ग्रामीण भागातील अनियमिततेवर ओढले ताशेरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 09:34 PM2018-01-18T21:34:40+5:302018-01-18T21:35:51+5:30
वाशिम - विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन पथकांनी १८ जानेवारीला दिवसभरात सहा तालुके पिंजून काढत ग्रामीण भागात आढळलेल्या अनियमिततेवर ताशेरे ओढले. सहाही पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी व संबंधित अधिका-यांची प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात सुनावणी घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन पथकांनी १८ जानेवारीला दिवसभरात सहा तालुके पिंजून काढत ग्रामीण भागात आढळलेल्या अनियमिततेवर ताशेरे ओढले. सहाही पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी व संबंधित अधिका-यांची प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात सुनावणी घेण्यात आली.
पंचायत राज समितीच्या चमूने गुरूवारी सकाळी १० वाजतापासून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय व अनुदानित वसतिगृह आदींना भेटी दिल्या. पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्या चमूने मानोरा व कारंजा तालुक्यात भेटी दिल्या. कारंजा तालुक्यातील धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायतीला भेट दिली असता, अनियमितता आढळून आली. धामणी येथील वैद्यकीय अधिका-यांना औषधी व जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबत माहिती विचारली असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यावरून पथकाने अधिका-यांना चांगलेच खडसावल्याची माहिती आहे. ग्रामसेवकाला घरकूल बांधकामासंदर्भात धारेवर धरले. त्यानंतर पथकाने कारंजा पंचायत समिती सभागृहात लेखा परीक्षण अहवालाच्या अनुषंगाने तसेच प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात गटविकास अधिकारी व अन्य अधिकाºयांची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीचा तपशील समजू शकला नाही. कामचुकार व दोषी आढळणा-या अधिका-यांची गय केली जाणार नाही, असे समिती प्रमुख सुधीर पारवे यांनी सांगितले. मानोरा पंचायत समितीच्या नवीन इमारतीत गटविकास अधिकारी व अन्य अधिका-यांची सुनावणी घेण्यात आली. तसेच तालुक्यातील शेंदुरजना अढाव, पोहरादेवी व अन्य काही गावांना भेटी दिल्या. शेंदुरजना येथील जिल्हा परिषद शाळेत चमूच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचे वृत्त आहे.
समिती सदस्य विरेंद्र जगताप यांच्या पथकाने वाशिम व मंगरूळपीर पंचायत समिती तसेच ग्रामीण भागातील कार्यालयांना भेटी दिल्या. वाशिम तालुक्यातील काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद, काटा ते खडकी या रस्ता कामाची पाहणी, अनसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व नागठाणा येथे भेटी दिल्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काटा ते खडकी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता बांधकामावर ब-याच त्रुटी आढळून आल्या. यासंदर्भात योग्य त्या नोंदी घेण्यात आल्या. मंगरूळपीर शहरातील एका अनुदानित वसतिगृहात पोषण आहार व अन्य भौतिक सुविधांसंदर्भात कमालिच्या गैरसोयी व त्रृट्या आढळून आल्याचे समिती सदस्य रणधीर सावरकर यांनी सांगितले. तेथील असुविधा व भोजनाचा निकृष्ट दर्जा पाहून गोरगरीब बालकांवर ‘अमानवीय अत्याचार’ सुरू असल्याचे दिसून आले, असेही सावरकर म्हणाले. शेलुबाजार, आसेगाव, भडकुंभा येथे भेटी देऊन पाहणी केली. अनियमितता आढळल्याप्रकरणी आवश्यक त्या नोंदीही घेण्यात आल्या. पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी व अन्य अधिका-यांची सुनावणी घेण्यात आली.
पंचायत राज समितीच्या तिस-या पथकातील आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पथकाने रिसोड व मालेगाव तालुक्यात भेटी देऊन झाडाझडती घेतली. सर्वप्रथम जोडगव्हाण ग्रामपंचायतला भेट दिली. किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गिव्हा कुटे येथिल अंगणवाडी व प्राथमिक शाळेची पाहणी केली. स्वच्छता गृहाची पाहणी करून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सूचना दिल्या. दुपारी १ वाजताच्या दरम्यान मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहात अनुपालन अहवाल व अन्य बाबींच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी व अन्य अधिका-यांची सुनावणी घेतली. यासंदर्भातील अहवाल पंचायत राज समितीच्या अध्यक्षांकडे दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे समिती सदस्य आमदार भरतसेठ गोगावले यांनी सांगितले. त्यानंतर चमू रिसोडकडे रवाना झाली. रिसोड तालुक्यातील पार्डीतिखे येथे भेट दिली असता, काही गंभीर बाबी उघड्या झाल्या. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते एका महिन्यापूर्वी उदघाटन झालेल्या स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आढळून आल्याने यासंदर्भात संबंधितांना जाब विचारण्यात आला. तसेच नवनिर्वाचित सरपंच शेषराव अंभोरे यांना अद्याप कार्यभार का दिला नाही, याचा जाबही आमदार गोगावले यांनी ग्रामसचिव व गटविकास अधिका-यांना विचारला. ग्रामपंचायतच्या कारभारातही अनियमितता आढळून आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात संबंधितांविरूद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सुतोवाच समिती सदस्यांनी केले.