वाशिम: पेरलेले बियाणे उगवलेच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:45 AM2020-06-19T10:45:25+5:302020-06-19T10:45:36+5:30
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित तालुका कृषी विभागासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रारीही केल्या आहे. पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी गुरुवारी दिली.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. त्या काळात झालेल्या पावसामुळे काही शेतात शेतकºयांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले; परंतु गत आठवडाभरात पेरणी केलेले बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. त्यात महाबीजसह इतर खासगी कंपन्या आणि घरगुती बियाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा या तीन तालुक्यांत हा प्रकार अधिक प्रमाणात घडला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत हा प्रकार घडला आहे. शेतकºयांनी या प्रकाराबाबत कृषी विभागासह महाबीजकडेही तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत १ लाख १४ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रात अर्थात ५३ टक्के पेरणी उरकली असून, यात १ लाख ६० हजार ९२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचेच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती मागविली आहे.
दुबार पेरणीतही समस्या उद्भवण्याची भीती
गतवर्षीच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदाच्या हंगामात शेतकºयांनी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यानंतरही बियाणे न उगवल्याचा प्रकार घडला आहे. यावरून यंदाच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमताच खालावल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन पिकाचीच दुबार पेरणी केल्यास बियाणे न उगवण्याची समस्या पुन्हा उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीनची दुबार पेरणी करावी की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक शेतकºयांकडून सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांना पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले असून, या प्रकाराची पाहणी होईल.
- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज