वाशिम : रास्तभाव दुकानांच्या प्रस्तावांची पुरवठा विभागाला प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:29 PM2017-12-28T13:29:28+5:302017-12-28T13:31:18+5:30
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा विभागाकडे पाठविले जाणार आहेत.
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा विभागाकडे पाठविले जाणार आहेत.
वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द, कुंभारखेडा, धारकाटा, खडसिंग, तांदळी शेवई, बिटोडा तेली, उमरा कापसे, कारंजा तालुक्यातील धनज बु., नागलवाडी, पोहा-१, पिंपळगाव खुर्द, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, केशवनगर, मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी, यशवंतनगर, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खुर्द, रिधोरा, वरदरी खुर्द, किन्हीराजा, धमधमी, पिंपळशेंडा, पांगरखेडा, मंगरूळपीर तालुक्यातील एकांबा, बालदेव, लावणा, भोतसावंगा, शेलगाव, स्वाशीन, वाडा या ३२ गावांमधील रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने नव्याने वितरीत करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. रास्तभाव धान्य दुकान चालविण्यासाठी इच्छुक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१७ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालयात मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची नेमकी किती संख्या आहे, याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला संबंधित तहसिल स्तरावरून मिळणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप तहसिल स्तरावरून माहिती न आल्याने ३२ रास्त भाव दुकानांसाठी किती अर्ज आले, याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला अद्याप प्राप्त नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखडे यांनी गुरुवारी सांगितले. तहसिल स्तरावर सध्या अर्जाची छाननी सुरू असून, परिपूर्ण व पात्र प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाला लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यानंतर रास्त भाव दुकानासाठी पात्र ठरलेल्या स्वयंसहायता बचत गटाची निवड केली जाणार आहे.