वाशिम : नाफेड तूर खरेदीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:53 PM2018-02-08T19:53:24+5:302018-02-08T19:55:59+5:30
मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने यांच्या नेतृत्वात तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने यांच्या नेतृत्वात तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी टोकण क्रमांकानुसार नाफेडची तूर खरेदी त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू असताना मालेगाव येथील नाफेड केंद्र बंद का, असा प्रश्न उपस्थित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सोमवारपर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरुवात न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर आक्रमक आंदोलन करेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहीत माने यांनी सांगितले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक दत्ताभाऊ जोगदंड, अजबराव बनसोड, विश्वनाथ जोगदंड, राहुल बनसोड, ओम गायकवाड, गजानन ढंगारे, श्याम ढंगारे, योगश काळे, अजय इंगोले, अनिल इंगळे, रहिम शहा, ज्ञानेश्वर देवळे, विवेक गवळी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी सोमवारपर्यंत नाफेडची तूर खरेदी चालू करून शेतक-यांचे कुठलेही नुकसान न होता त्यांची तूर मोजून घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.