वाशिम तालुक्यात तीन दिवसांत आढळले ५२ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:17 AM2021-02-21T05:17:18+5:302021-02-21T05:17:18+5:30
वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असून, गत तीन दिवसांत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग ...
वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असून, गत तीन दिवसांत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने शनिवारी केले.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत वाशिम शहरात जवळपास १,८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सप्टेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी सात दिवस जनता कर्फ्यूही पाळला होता. दरम्यान, ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला. वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने नागरिक बिनधास्त झाले. बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढली आणि बहुतांश नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांची चिंताही वाढली आहे. १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांत वाशिम तालुक्यात ५२ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला. यामध्ये ३६ रुग्ण वाशिम शहरातील तर उर्वरित १६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
०००००
बॉक्स
तीन दिवसांत एकूण रुग्ण आढळले - ५२
१७ फेब्रुवारी - १४
१८ फेब्रुवारी - १६
१९ फेब्रुवारी - २२
००००००
शहरात आढळले - ३६
ग्रामीण भागात आढळले - १६
००००००
बॉक्स
नागरिकांनी स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपावे
कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर ते १६ फेब्रुवारीपर्यंत वाशिम येथील बाजारपेठ गर्दीने फुलली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांकडे मध्यंतरी दुर्लक्ष झाले. आता गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जमावबंदीचा आदेश दिला. असे असतानाही पाटणी चौक व अन्य ठिकाणी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपण्यासाठी नागरिकांनी आता तरी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे गरजेचे ठरत आहे.
००००