वाशिम तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:41+5:302021-07-19T04:25:41+5:30
वाशिम : जुलै महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसांत वाशिम शहरात ४ तर ग्रामीण भागात दोन ...
वाशिम : जुलै महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसांत वाशिम शहरात ४ तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले. वाशिम तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने केले.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दरम्यान, दुस-या लाटेत मार्च ते मे महिन्यात वाशिम शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. ८ ते १७ जुलै या १० दिवसात वाशिम शहरात चार तर ग्रामीण भागात दोन असे एकूण सहा कोरोना रुग्ण आढळून आले. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासीयांची चिंता ब-याच अंशी कमी होत आहे. रुग्णसंख्येत घट झाल्याने शहरासह तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
००००
बॉक्स
गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे
सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे वाशिम येथील बाजारपेठ गजबजलेली असते. कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता गृहीत धरता नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
००
दहा दिवसात असे आढळून आले रुग्ण
दिनांक शहरग्रामीण
८ जुलै - ०१ ००
९ जुलै - ०१ ००
१० जुलै - ०० ००
११ जुलै - ०० ००
१२ जुलै - ०० ००
१३ जुलै - ०१ ००
१४ जुलै - ०१ ०१
१५ जुलै - ०० ०१
१६ जुलै - ०० ००
१७ जुलै - ०० ००