वाशिम : मालेगाव तालुक्यात एकाच रात्री पाच गावांमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:18 AM2017-12-19T01:18:32+5:302017-12-19T01:20:56+5:30
मालेगाव: तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, पांगरीकुटे आणि मानका या पाच गावांमध्ये १७ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, पांगरीकुटे आणि मानका या पाच गावांमध्ये १७ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शिरपूर जैन येथे १७ डिसेंबरच्या मध्यरात्री पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५0 मीटर अंतरावर असलेल्या प्रफुल्ल बोधने यांच्या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २0 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. याच दुकानानजीक असलेल्या श्याम दीक्षित यांचेही दुकान फोडून १५ हजार रुपये किमतीचे बेन्टेक्स दागिने, ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बेसर आणि १0 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक काटा लंपास केला. याप्रकरणी दाखल तक्रारींवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध १८ डिसेंबरच्या सकाळी गुन्हय़ाची नोंद केली.
तालुक्यातील ग्राम मुंगळा येथील महाराष्ट्र मल्टीस्टेट अर्बन सोसायटीचे लोखंडी शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला व आलमारीमध्ये ठेवलेले ‘डेली कलेक्शन’चे रोख ५,८७0 रुपये चोरून नेले. यासंदर्भात व्यवस्थापक राजेश बंडू बळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राम पांगरी कुटे येथे तर चोरट्यांनी १७ डिसेंबरच्या रात्री अक्षरश: धुडगूस घातला. परगावी गेलेल्या ग्रामस्थांची घरे धुंडाळून चोरट्यांनी हात साफ केला. त्यात भीमराव पंढरी गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील १0 गॅम सोन्याचे कानातील झुमके, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, गायकवाड यांच्या भावसुनेच्या घरातील ५ ग्रॅम सोन्याचे झुमके, अनिल नामदेव कुटे यांच्या फोटो स्टुडिओतून रोख ४५ हजार रुपये, रामकृष्ण ऊर्फ गोपाल कुंडलीक कफटे यांच्या जनरल स्टोअर्समधून रोख ४ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
तालुक्यातील माणका या गावातही १७ डिसेंबरच्या रात्री अँड. शंकरराव सखाराम मगर यांच्या बाहेरून बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, घरात काहीच न सापडल्याने कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. त्याच गावातील मालेगाव येथे राहत असलेले यादवराव पळसकर यांच्याही घरात चोरीचा प्रयत्न झाला. याशिवाय एकांबा या गावातील बंडू वानखेडे, विलास दौलतराव गवळी यांच्या घरात; तर नारायण गवळी व रामराव कावरखे यांच्या दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. तथापि, एकाच रात्री तब्बल पाच गावांमध्ये चोरट्यांनी घातलेल्या धुडगुसामुळे नागरिक धास्तावले असून, या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
रिसोडमध्येही धाडसी चोरी; ७५ हजारांचा ऐवज लंपास!
रिसोड शहरातील सिव्हिल लाइन रोडस्थित गीता फर्निचर या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी १७ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान ७५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. रिसोडमध्ये डिसेंबर महिन्यात चोरीच्या मोठय़ा तीन घटना घडल्या असून, गत आठवड्यात लोणी फाट्यावरील मोबाइल शॉपीचे शटर फोडून २ लाख ७0 हजारांचा माल लंपास झाला होता. चार दिवसांपूर्वी भरदिवसा प्राध्यापकाच्या घरी ९0 हजारांची चोरी झाली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच पुन्हा १७ डिसेंबरच्या रात्री शहरातील मुख्य रस्त्यावरील गीता फर्निचरचे शटर तोडून चोरट्यांनी एलईडी टीव्ही, पंखे व इतर साहित्य असा ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गिरधर तापडिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५४, ३७९ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
-