बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम अव्वल; वाशिमचा निकाल ९५.६९ टक्के
By संतोष वानखडे | Published: May 21, 2024 02:47 PM2024-05-21T14:47:43+5:302024-05-21T14:48:42+5:30
मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर; बारावीच्या निकालात मुली आघाडीवर
संताेष वानखडे, वाशिम: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहिर झाला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल राहिला. अमरावती विभागाचा निकाल ९३ टक्के असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.६९ टक्के आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १९ हजार ५१६ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४०९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९५.६९ एवढी आहे. उत्तीर्ण १८ हजार ५७४ विद्यार्थ्यांमध्ये १०८२९ मुले व ७७४५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.२५ तर मुलींची टक्केवारी ९६.३३ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.८८ टक्के, कला शाखेचा ९०.४२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.३८ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८८.२२ टक्के निकाल लागला आहे.
मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर
बारावीच्या निकालात जिल्ह्यात मालेगाव तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. मालेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.४५ टक्के लागला. दुसऱ्या क्रमांकावर रिसोड तालुका ९७.१५ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर वाशिम तालुका ९६.६५ टक्के, चवथ्या क्रमांकावर मानोरा तालुका ९४.४६ टक्के, पाचव्या क्रमांकावर कारंजा तालुका ९२.५३ तर सर्वात कमी निकाल मंगरूळपीर तालुक्याचा ९२.३३ टक्के लागला आहे.
..........