अमरावती विभागात वाशिम अव्वल!

By admin | Published: May 31, 2017 01:10 AM2017-05-31T01:10:18+5:302017-05-31T01:10:18+5:30

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ९१.३१ टक्के निकाल : रिसोड तालुका आघाडीवर, तर मानोरा तालुका माघारला!

Washim tops in Amravati division | अमरावती विभागात वाशिम अव्वल!

अमरावती विभागात वाशिम अव्वल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चौथ्या क्रमांकावर होता.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.
वाशिम तालुक्यात २४०६ मुले व १६६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१८१ मुले व १६८६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. मालेगाव तालुक्यात १५०३ मुले व ८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३०७ मुले व ७६१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.९६ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.९२ अशी आहे. रिसोड तालुक्यात २६७५ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २५०६ मुले व १५२९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. कारंजा तालुक्यात १४६० मुले व ११७८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३१८ मुले व १११७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.२७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.८२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३४७ मुले व १०६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२१० मुले व ९९१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.८३ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.९६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२०८ मुले व ७७९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १००६ मुले व ६८१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे. ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४३.६९ टक्के लागला आहे.

रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर
मागील वर्षी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिसोड तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. गतवर्षी क्रमांक एकवर असलेला मंगरूळपीर तालुका यंदा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेला मानोरा तालुका यावर्षी सहाव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेला मालेगाव तालुका यावर्षी पाचव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर असलेल्या वाशिम तालुक्याने यावर्षी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी सहाव्या स्थानावर असलेला कारंजा तालुका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आला आहे.

गतवर्षीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी!
गतवर्षीच्या बारावीच्या निकालात टक्केवारीच्या दृष्टीने मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही टक्केवारीत अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवत मुलींनी चारच्या आसपास अधिक टक्केवारी मिळविली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.४१ अशी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० अशी आहे. गतवर्षी मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८२.९९ तर मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ८७.९१ अशी आहे. २०१५ मध्ये मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.२६ अशी होती.

प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ!
जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात प्राविण्य श्रेणीत ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा प्राविण्य श्रेणीत तब्बल ११३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रथमश्रेणीत ५२७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी द्वितीय श्रेणीत ५२४४ तर उत्तीर्ण श्रेणीत २१४ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले होते. यावर्षी द्वितीय श्रेणीत ५९२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १९० विद्यार्थी आहेत.

Web Title: Washim tops in Amravati division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.