वाशिम जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:55 PM2019-03-06T17:55:23+5:302019-03-06T17:55:31+5:30
जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल (हप्ता वसूली) यामाध्यमातून होत असल्याचे गंभीर वास्तव ‘लोकमत’ने ४ मार्च रोजी ‘जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केले. त्याची दखल घेवून जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले.
वाशिम शहरातील पोस्टआॅफीस चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, अकोला नाका, रिसोड नाका या ठिकाणांहून काळी-पिवळी वाहने आणि आॅटोच्या माध्यमातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक सुरू होती. यासह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या शहरांमधूनही गेल्या काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू होती. वेळप्रसंगी छताच्या टपावर प्रवासी घेवून रस्त्याने धावणाºया अशा नियमबाह्य वाहनांमुळे ग्रामीण प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला होता. दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने ४ मार्च रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून हा गंभीर प्रश्न उजेडात आणला. त्याची तडकाफडकी दखल घेवून जिल्हा वाहतूक विभागाने ५ मार्चपासून वेगवेगळे पथक गठीत करून त्यांच्यामार्फत अवैध प्रवासी वाहनांवर धडक कारवाईचे सत्र अवलंबिले आहे. त्यामुळे सुरू असलेला अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रकार काहीअंशी थांबल्याचे निदर्शनास येत आहे.