वाशिम : सोन्याची बनावट नाणी विकणारे दोनजण जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 08:28 PM2018-02-18T20:28:22+5:302018-02-18T20:31:17+5:30
वाशिम : येथील गजानन वामनराव वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची बनावट नाणी विकणाºया दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलिसांना यश मिळाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धही १८ फेब्रुवारीला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील गजानन वामनराव वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची बनावट नाणी विकणा-या दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलिसांना यश मिळाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धही १८ फेब्रुवारीला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गजानन वानखेडे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ते १५ फेब्रुवारीला मालेगाव येथे जाण्याकरिता वाशिमच्या अकोला नाका परिसरात बसची प्रतीक्षा करित असताना त्यांच्याजवळ एक इसम आला. माझ्याजवळ प्रत्येकी २ ग्रॅमची सोन्याची नाणी असून ती तुला २ हजार रुपये प्रति नाणे याप्रमाणे देतो, असे सांगून सोन्यासारखे दिसणारे नाणे त्याने आपणास दाखविले. अधिकचे नाणे घेवून १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता अकोला नाक्यावरच भेटू, असे सांगून तो तेथून निघून गेला. फिर्यादीत नमूद अशा आशयाच्या माहितीवरून वाशिम शहर पोलिसांनी १७ फेब्रुवारीला अकोला नाक्यावर सापळा रचला. यावेळी लक्ष्मण मधुकर चव्हाण (वय ४० वर्षे, रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) याच्यासह शेरूप सत्तूजी चव्हाण (वय ४५ वर्षे, रा. सुकळी, ता. वाशिम) या दोघांनी गजानन वानखेडे यांना गाठून बोलणी सुरू केली असता, पोलिसांनी सोन्याच्या बनावट ३१० नाण्यांसह दोघांनाही ताब्यात घेतले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोन्हीही आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वाशिम शहर पोलिस करित आहे.