Washim: दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त! नागरिकांमध्ये दहशत
By संतोष वानखडे | Published: June 10, 2023 09:11 PM2023-06-10T21:11:09+5:302023-06-10T21:11:29+5:30
Washim Crime News: वाशिम शहरातील वृंदावन पार्कमधील एका इमारतीतून तीन युवकांकडून एका पिस्टलसह धारदार शस्त्र जप्त करण्याच्या घटनेची शाइ वाळत नाही.
- संतोष वानखडे
वाशिम : वाशिम शहरातील वृंदावन पार्कमधील एका इमारतीतून तीन युवकांकडून एका पिस्टलसह धारदार शस्त्र जप्त करण्याच्या घटनेची शाइ वाळत नाही; तेच शनिवारी (दि.१०) सकाळी स्थानिक रविवार बाजारातील पार्किंग परिसरात पिस्टलसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोन युवकांना पकडण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाशिम येथील रविवार बाजारातील पार्किंगमध्ये २ इसम विनापरवाना कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ इसमांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव विनोद वसंता भोयर (२७), अनिल मारोती भोयर (२५) दोन्ही रा.वांगी, ता.जि.वाशिम अशी नावे सांगितले. अंगझडतीत २ देशी बनावटीच्या पिस्टल, १३ जिवंत काडतूस, एक धारदार लोखंडी कत्ता, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण १ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. दोन्ही आराेपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली.