Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:40 AM2021-06-02T11:40:21+5:302021-06-02T11:40:30+5:30

Washim Unlock: वाशिम शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ १ जून रोजी गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले.

Washim Unlock: Market thrives on tightening restrictions; The merchants were also relieved | Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले

Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निर्बंध शिथिल होताच, दीड महिन्यानंतर वाशिम शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ १ जून रोजी गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे.
दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील जनतेला संबोधित करताना, १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून निर्बंध कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आणि प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावीणदेखील सुरू केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडू लागली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ९ मेपासून निर्बंध आणखी कडक केले. 
यामध्ये टप्प्याटप्प्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील काही दुकानांना मुभा मिळत गेली. मात्र, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने बंदच ठेवण्यात आली. कडक निर्बंधांचे चांगले परिणाम दिसून आले असून, कोरोनाचा आलेख खाली आला. 
पॉझिटिव्हिटी रेटही ५ टक्क्यांपर्यंत नीचांकी आला. यामुळे १ जूनपासून पुढील सात दिवसांसाठी निर्बंध शिथिल झाले असून, यानुसार जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. यामुळे गत दीड महिन्यापासून ओस पडलेली बाजारपेठ पहिल्याच दिवशी १ जून रोजी ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. 
वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे पाहावयास मिळाले. 
कोरोनाचा आलेख खाली आला असला तरी धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


ग्रामीण भागातील नागरिकांकडून ताडपत्री, शेतीविषयक साहित्याची खरेदी
कडक निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक शक्यतोवर शहरी भागातील बाजारपेठेत येणे टाळत होते. निर्बंध शिथिल झाल्याने पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्लास्टिक कापड, ताडपत्री यांसह शेतीविषयक वस्तू, साहित्याची खरेदी करण्यासाठी शहरी भागातील बाजारपेठ गाठल्याचे दिसून आले. पावसाळा तोंडावर असल्याने घराची डागडुजी म्हणून टीनपत्रे, प्लास्टिक कापड, ताडपत्री आदींची खरेदी होत असल्याचे दिसून येते.


भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी ! 
पाटणी चौकस्थित भाजीपाला बाजार हा विखुरलेल्या ठिकाणी अन्यत्र भरविण्यात येतो. सुंदरवाटिका, लाखाळा परिसर, सिव्हिल लाइन रोड, जुनी आययूडीपी रोड यांसह अन्य भागांत भाजीपाला विकला जात असून, सुंदरवाटिका रोडस्थित भाजीपाला बाजारात नागरिकांची एकच गर्दी होत असल्याचे दिसून येते. या गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव तर वाढणार नाही ना? याची दक्षताही कुणाकडून घेतली जात नाही.


प्रत्येक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक
निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास हातभार लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक ठरत आहे. जीवनावश्यक व अन्य वस्तू, साहित्याची खरेदी करणे आवश्यकच आहे. परंतु, बेजबाबदार वागणुकीतून कोरोना संसर्ग तर वाढणार नाही ना? याचे भान ठेवणेही गरजेचे आहे.

Web Title: Washim Unlock: Market thrives on tightening restrictions; The merchants were also relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.