वाशिम: नऊ खासगी रुग्णालयांमध्ये मिळेल अडीचशे रुपयांत लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:36 AM2021-03-01T11:36:31+5:302021-03-01T11:36:40+5:30
CornaVaccine : सात शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत देण्यात येणार असून, ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये देऊन ही लस घेता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आरोग्य विभागाने १ मार्चपासून खासगी आणि शासकीय रुग्णालयात सर्वसामान्यांतील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्यात सात शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत देण्यात येणार असून, ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये देऊन ही लस घेता येणार आहे.
आरोग्य विभागाने १ मार्चपासून सर्वसामान्यांतील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसह ४५ वर्षे वयांवरील गंभीर आजारग्रस्त रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सर्व नियोजन केले आहे. शासनाच्या सूचनेनुसार या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असून, यात खासगी दवाखान्यांची ई-पॅनलद्वारे निवड केली आहे. जिल्ह्यातील ९ खासगी आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. लोकांना नोंदणी केल्यानंतर लस टोचून घेण्याची तारीख देण्यात येणार असून, त्या तारखेला लसीसाठी बोलावले जाईल.
मोबाइल अॅपवरही नोंदणी
आरोग्य विभागाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजारग्रस्त लोकांना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन २ अॅपद्वारे अॅण्डॉइड मोबाइलवर लस घेऊन इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येणार असून, संबंधित लसीकरण केंद्रावरही प्रत्यक्ष नोंदणीची व्यवस्था करण्याची तयारी सुुरू आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालये
१) जिल्हा सामान्य रुग्णालय
२) कारंजा उपजिल्हा रुग्णालय
३) मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय
४) रिसोड ग्रामीण रुग्णालय
५) मालेगाव ग्रामीण रुग्णालय
६) मानोरा ग्रामीण रुग्णालय
७) रेनॉल्ड्स हॉस्पिटल, वाशिम
खाजगी रुग्णालये
१) डॉ. व्होरा हॉस्पिटल, वाशिम
२) मॉ गंगा मेमोरियल हॉस्पिटल, वाशिम
३) बालाजी बालरुग्णालय, वाशिम
४) बाजड हॉस्पिटल, वाशिम
५) वाशिम क्रिटिकल केअर सेंटर, वाशिम
६) लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
७) बिबेकर हॉस्पिटल, वाशिम
८) देवळे हॉस्पिटल, वाशिम
९) कानडे हॉस्पिटल, वाशिम
ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारग्रस्तांनाच लस
शासनाकडून पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि खासगी आरोग्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.