वाशिम : विदर्भ, मराठवाड्यातील भजनी दिंड्या शिरपुरात, महाशिवरात्री उत्सव; ७५ हजार भाविकांना महाप्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:42 PM2018-02-15T14:42:24+5:302018-02-15T14:42:29+5:30
जानगीर महाराज संस्थानवर गेल्या आठवडाभरापासून आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप १५ फेब्रुवारीला करण्यात आला. यानिमित्त आयोजित जानगीर महाराजांच्या पालखीत विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तब्बल ७५ हजार भाविकांना १४ फेब्रुवारीला महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
वाशिम (शिरपूर जैन): येथील जानगीर महाराज संस्थानवर गेल्या आठवडाभरापासून आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप १५ फेब्रुवारीला करण्यात आला. यानिमित्त आयोजित जानगीर महाराजांच्या पालखीत विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तब्बल ७५ हजार भाविकांना १४ फेब्रुवारीला महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानवर दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवात श्रीमद भागवत कथा, किर्तन, भजन, प्रवचन, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे. १४ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी ७५ हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. १५ फेब्रुवारीला सकाळी संस्थानमध्ये जानगीर महाराजांना अभिषेक करण्यात आला. यानंतर गावातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यांसह २० हजार भाविक सहभागी झाले होते. जानगीर महाराज की जय, ओंकारगीर महाराज की जय, असा जयघोष करीत ही पालखी फिरविण्यात आली. परंपरेनुसार गावातील हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहमध्ये या पालखीचे स्वागत व पुजन करण्यात आले. या पालखीत शिरपूर परिसरातील बँडपथकेही सहभागी झाली होती. महिला भाविकांच्या फुगड्या या पालखीचे आकर्षण ठरल्या होत्या. पालखीत सहभागी भाविकांसाठी तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भालेराव, संत सावतामाळी युवा मंडळ, जय मल्हार युवा मंडळ, अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्यावतीने अल्पोपहार, भोजन आणि चहापाणासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.