वाशिम : जिल्ह्यातील तूर उत्पादकांना नाफेड खरेदीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:48 PM2018-01-13T13:48:03+5:302018-01-13T13:50:03+5:30
वाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, या शेतक-यांना आता नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षा लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

खरीप हंगामातील तुरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे; परंतु व्यापाºयांकडून बाजारात हमीदरापेक्षा तब्बल हजार रुपये कमी दर देण्यात येत आहेत. शासनाने तुरीला बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीदर निश्चित केले असताना बाजारात मात्र व्यापा-यांकडून ३ हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना उसणवारी परत करणे, घराचा गाडा ओढणे, लग्न सोहळ्याच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने हे शेतकरी नाईलाजास्तव बाजारात तूर विकत आहेत. दर दिवसाला जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या मिळून सरासरी ३० हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. शासनाकडून नाफेड खरेदीची घोषणा केल्यानंतर शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत; परंतु गत आठ दिवसांपासून या शासकीय तूर खरेदीसाठी शेतक-यांची नोंदणी सुरू करण्यात आली असली तरी, अद्याप कोणत्याही बाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतर्गत आजवर ९ हजार ३५० पेक्षा अधिक शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी खरेदी विक्री समित्यांकडे आॅनलाईन नोंदणीही केली असताना नाफेडची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे; परंतु पणन महासंघाचे जिल्हा व्यवस्थापक अद्यापही शेतक-यांना केवळ तुरीच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहनच करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांकडील तूर संपल्यानंतर ही खरेदी सुरू होणार का, अशी शंका तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.