वाशीम : मानोरा तालुक्यात पाणी पेटले; पाच तास रास्तारोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:17 PM2017-12-22T20:17:52+5:302017-12-22T20:33:38+5:30
मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा /दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावक-यांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गत तीन-चार वर्षांपासून दापूरा येथील नगारिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची मागणी गावातील सर्वपक्षीय पुढारी, युवकांनी शासन व प्रशासनदरबारी केली होती. या मागणीचा पाठपुरावादेखील केला. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे पाहून गावातील गिताबाई रूंदन राठोड यांनी बागायतीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन ही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणून दिली. म्हसणीच्या धरणावरून पाण्याची सोय उपलब्ध केली. यासाठी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राकडून वीजपुरवठा घेण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा प्रशासनातर्फे खंडित करण्यात आला. गत एका महिन्यापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी गावक-यांकडून तहसिलदारांकडे केली जात आहे. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने आणि गावात तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेवटी शुक्रवारला गावक-यांच्या संयमाचा बांध फुटला. मानोरा-कारंजा मार्गावर दापूरा फाटा येथे सकाळी १० वाजतापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसिदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तहसिलदारांनी मौन धारण केले. ठोस तोडगा निघत नसल्याचे पाहून महामंडळाच्या बसवर चढून महिलांनी बस अडविली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीजजोडणी करण्यात आली. त्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी जि.प.सदस्य अनिता राऊत, पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, सरपंच तुळशिराम गावंडे, सरपंच भारत दरेकार, धनराज दिघडे, प्यारेलाल राठोड, शिवसेना शाखा प्रमुख पकंज चव्हाण यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.